मुंबईतल्या बीडीडी चाळींना राजकीय नेत्यांची नावं, पण बीडीडीवासीय म्हणतात...

मुंबईतील बीडीडी (BDD) चाळींच्या नामकरणाबाबत शासन निर्णय जारी

Updated: Jun 4, 2022, 03:42 PM IST
मुंबईतल्या बीडीडी चाळींना राजकीय नेत्यांची नावं, पण बीडीडीवासीय म्हणतात...  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील बीडीडी (BDD) चाळींच्या नामकरणाबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वरळीतील बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ ही शरद पवार नगर तर ना. म. जोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावाने ओळखली जाणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या नामकरणाची घोषणा केली होती.

नामकरणाला बीडीडी वासीयांचा विरोध
मुंबई शहरातील बीडीडी चाळी सुमारे 100 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. त्यामुळे बीडीडी चाळींचा पुनर्विकास कार्यन्वित करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. पण मुंबईतील बीडीडी चाळींना राजकीय नेत्यांची नावं देण्याला बीडीडी वासीयांचा विरोध आहे. चाळींना नावं द्यायचीच असतील तर महापुरुषांची नावं द्या, असं बीडीडी वासीयांचं म्हणणं आहे. 

शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता मग बीडीडी चाळींना या महापुरुषांची नावं द्या अशी मागणी करत आम्हाला विश्वासत न घेता सलकारने चाळींच्या नामकरणाचा धाट घातल्याचा आरोप बीडीडी वासीयांनी केला आहे.  बी डी डी पुनर्विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून हा नामकरणाचा घाट कशासाठी असा सवालही बी डी डी वासीयांनी उपस्थित केला आहे.

बीडीडी चाळीचा पुनर्विकास
100 वर्षांहुन अधिक जुन्या अशा वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन 2017 मध्ये झालं. मात्र अनेक कारणांमुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. वरळीतील कामाला जुलै 2021 मध्ये सुरुवात झाली. तर आता नायगावमधील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात करण्यात येत आहे.

मुंबईतल्या बीडीडी चाळींची ओळख मागच्या शंभर वर्षांपासूनची आहे. या ठिकाणी अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. या ठिकाणी अनेक मुंबईकरांनी, कष्टकऱ्यांनी घाम गाळला आहे. याच बीडीडी चाळीचं नामकरण केलं जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली होती.