Andheri By Poll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबा

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके (Rutuja Latke) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Updated: Oct 5, 2022, 03:14 PM IST
Andheri By Poll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबा title=

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke Death) यांच्या यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Andheri By Poll 2022) लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार न देता महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके (Rutuja Latke) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. (mpcc president nana patole announced support to late mla ramesh latke wife rutuja latke in andheri by poll eletion 2022 against bjp murji patel)

नाना पटोले काय म्हणाले?

"विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी धर्मांत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली होती. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होतं. या सरकारने शेतकरी कर्जमाफी सारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले", असं म्हणत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

"महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील" असंही पटोले म्हणाले.

ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल

या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा थेट सामना रंगणार आहे.उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात आहे.