राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या 'त्या' युवासेना कार्यकर्त्याची बढती

वरूण सरदेसाईंनी मोहसीन शेखचं केलं कौतुक 

Updated: Aug 27, 2021, 12:21 PM IST
राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या 'त्या' युवासेना कार्यकर्त्याची बढती  title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. या राजकीय वादात कार्यकर्ता मात्र भरडला जातो. पण युवासेनेच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांचा मार खाणं फायद्यात ठरलं आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यासमोर शिवसेना आणि राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी पोलिसांचा बेदम मार खाणा-या युवासैनिक मोहसीन शेखला प्रमोशन मिळालं आहे, 

नारायण राणेंच्या मुंबईच्या घराबाहेर आंदोलन करताना पोलिसांचा बेदम मार खाणा-या युवासैनिक मोहसीन शेखला प्रमोशन मिळालं आहे. युवासेनेच्या सहसचिवपदी मोहसीन शेखला नियुक्त करण्यात आलंय. राणेंच्या घराबाहेर आंदोलन करणा-या मोहसीन शेखला पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं होतं. या मारहाणीत तो जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीची क्लिप व्हायरल झाली होती. आता त्याला सहसचिव पदावर बढती देण्यात आली आहे.

मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारले होते. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झालीय. जी पाहून अनेकजण हळहळले होते. त्यामुळेच आता त्याची आता युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

मोहसीनची पत्नी दुसऱ्या पक्षाची नगरसेविका

मोहसीन शेख याची पत्नी नादिया शेख ही राष्ट्रवादी काँग्रेसची शिवाजीनगर, मानखूर्द येथून नगरसेविका आहे. चार वर्षांपूर्वी मोहसीन शेख यांने शिवसेनेत प्रवेश केला आहे. पत्नी मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.