.. तर आपण देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल; मनसेचा राऊतांना खोचक टोला

मनसेने राऊतांना दिला प्रसिद्ध होण्याचा सल्ला 

Updated: Jun 8, 2020, 11:39 AM IST
.. तर आपण देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल; मनसेचा राऊतांना खोचक टोला  title=

मुंबई : मनसे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं दिसतंय. सोनू सूद वरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राऊतांना सल्ला दिला आहे. सोनू सूद सारखं प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्ही काय करायला हवं? असं संदीप देशपांडेंनी या व्हिडिओत म्हटलं आहे. (मुख्यमंत्र्यांच्या भेटीअगोदर सोनू सूदचं मराठीत ट्विट) 

 

राऊत साहेब, सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एक तर टेस्ट होत नाहीत. टेस्ट झाल्या तर ऍम्ब्युलन्स मिळत नाहीत. ऍम्ब्युलन्स मिळाली तर सरकारी रूग्णालयात जागा मिळत नाही. जागा मिळालीच तर सरकारी रूग्णालयाची परिस्थिती वाईट आहे. खासगी रूग्णालये वाटेल तशी बिलं आकारत आहेत. अशी सद्या रूग्णांची अवस्था आहे. आपण जर रूग्णांची अवस्था सुधारलीत तर आपण देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध होऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर रूग्णांना दिलासा देण्याचं काम जर केलंत. तर मी स्वतः सामना प्रेसवर येऊन आपल्या पाया पडायला तयार आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. (सोनू सूदच्या मातोश्री भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला) 

महाराष्ट्रात खास करून मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना रूग्णाचे सरकारी आणि खासगी या दोन्ही रूग्णालयात हाल होत आहेत. सरकारी रूग्णालयाची परिस्थिती वाईट आहे. तर खासगी रूग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल आकारलं जात आहे. यामुळे रूग्णांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. अशावेळी जर रूग्णांची अवस्था सुधारली तर तुम्ही देखील सोनू सूद सारखे लोकप्रिय व्हाल असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी राऊतांना लगावला आहे.  (सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारे ट्वीट डिलीट होतायत, हे आहे कारण) 

संदीप देशपांडे एवढ्यावरच थांबले नाही तर जर तुम्ही रूग्णांना दिलासा देण्याचं काम केलंत तर मी स्वतः सामना प्रेसवर येऊन आपल्या पाया पडेन असं देखील देशपांडे यावेळी म्हणाले. संजय राऊतांनी 'सामना' रोखठोकमधून सुरू केलेला हा वाद शमण्याच काही नाव घेत नाही.