"आपण तरी बेसावध राहू नका...", राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. 

Updated: Jun 30, 2022, 08:29 PM IST
"आपण तरी बेसावध राहू नका...", राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला title=

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. 

"आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन!", असं ट्वीट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.

1980 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 1970-80 च्या दशकातील महाराष्ट्रातील इतर तरुणांप्रमाणेच एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा प्रभाव होता. 1980 च्या दशकात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि किसन नगरचे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवर पक्षाच्या अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर होते.

2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत  

1997 मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नगरसेवकपदाचे तिकीट दिले आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 2001 मध्ये त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतेपदी निवड झाली आणि 2004 पर्यंत ते या पदावर राहिले. 2004 मध्ये एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. 

2014 मध्ये विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले

एकनाथ शिंदे यांची 2005 साली शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीनंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच शिवसेनेशी संबंधित असून ते सध्या ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे.