राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? या भेटीमागचं 'राज' काय?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत बाळगली जातेय कमालीची गुप्तता 

Updated: Aug 29, 2022, 08:48 PM IST
राज ठाकरे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? या भेटीमागचं 'राज' काय? title=

Maharashtra Politics : सोमवारची सकाळ उजाडली तीच एका राजकीय भेटीच्या बातमीने. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भल्या सकाळी भाजप (BJP) नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतल्याच्या बातमीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सागर बंगल्यावरील या भेटीत दोघांमध्ये तासभर खलबतं झाल्याचं समजतंय. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

या भेटीमागचं 'राज' काय?
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election 2022) तोंडावर मनसे-भाजप युतीच्या (MNS-BJP Alliance) दृष्टीनं ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच ही भेट झालीय, हे विशेष. राज्यातील सत्तासंघर्ष तसंच हिंदुत्वाच्या मुद्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. 

राज ठाकरे यांनी सध्या जहाल हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका घेतलीय. आधी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेनं आक्रमक आंदोलन केलं. आता मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक अशी घोषणा देत मनसेनं सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतलीय. मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड देण्याची राज ठाकरेंची भूमिका सध्याच्या राजकारणात भाजपच्या दृष्टीनं सोयीची मानली जातेय.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत दोन्ही बाजूंनी कमालीची गुप्तता बाळगली जातेय. या भेटीबाबत अधिकृतपणं कुणी काही बोलायला तयार नाही. मात्र ही भेट झाली, असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय. या भेटीमागं नेमकं काय राजकारण आहे, हे लवकरच समोर येईल.