मुंबई: भाजप आमदार राम कदम यांची अवस्था सध्या आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. दहीहंडीच्या दिवशी महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा वाद शमतो ना तोच आता राम कदम यांनी नवा प्रताप करुन ठेवला आहे. राम कदम शुक्रवारी दुपारी बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला श्रद्धांजली वाहून मोकळे झाले. सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेत आहे. मात्र, सोनालीची प्रकृती चांगली आहे. काही दिवसांपूर्वीच सोनालीने ट्विटरवरून स्वत:चे काही फोटोही शेअर केले होते. एकूणच सोनाली बेंद्रे तिच्यावरील उपचारांना व्यवस्थितपणे प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
मात्र, राम कदम यांनी शुक्रवारी दुपारी अचानक सोनाली बेंद्रेचे निधन झाल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. त्यांच्या या ट्विटनंतर चांगलीच खळबळ माजली. आपली चूक लक्षात आल्यानंतर राम कदम यांनी तात्काळ आपले ट्विट डिलिट केले. त्यानंतर राम कदम यांनी सारवासारव करणारे ट्विट केले. सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो' असे ट्विट त्यांनी केले. मात्र, या ट्विटरवरून आता राम कदम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
About Sonali Bendre ji It was rumour . Since last two days .. I pray to God for her good health & speedy recovery
— Ram Kadam (@ramkadam) September 7, 2018