मिम्स व्हायरल, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 'ती' मेगाभरती नोकरीची नव्हती तर...

सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा आहे.

Updated: Jul 30, 2019, 05:39 PM IST
मिम्स व्हायरल, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 'ती' मेगाभरती नोकरीची नव्हती तर...  title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक विनोद वेगात व्हायरल होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड आणि नवी मुंबईतले आमदार संदीप नाईक तसंच काँग्रेसचे मुंबईतले नायगावमधले आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्षांतरामुळे एकीकडे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी ५० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता असताना १५ वर्ष हे आमदार राष्ट्रवादीबरोबर होते. मागची पाच वर्ष विरोधी पक्षात काढली. आता सत्तेत न राहणं या आमदारांना अस्वस्थ करत असावं.

विकास कामांचं कारण देऊन जरी हे आमदार पक्ष सोडून सत्ताधारी भाजपाच्या गोटात सामील होत असले तरी भाजपमध्ये जाण्यामागचं प्रत्येक आमदाराचं खरं कारण वेगळं आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निराशेचं वातावरण आहे. त्यातच हमखास निवडून येणारे आमदारच पक्षाची साथ सोडून भाजप आणि शिवसेनेत दाखल झाल्याने दोन्ही पक्षातील हतबलता आणि निराशा आणखीनच वाढताना दिसते आहे.