मुंबई : मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी प्रवास खर्च आणि खाण्या-पिण्यांवर लाखो रूपयांचा खर्च करत मोठी उधळपट्टी केली असल्याचा आरोप 'हिंदू विधीज्ञ परिषदे'चे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलाय. त्यामुळं सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
२०१५-१६ च्या कालावधीत ट्रस्टच्या विश्वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली १२ लाख ९१ हजार रुपयांचा खर्च केला आहे. ज्यामध्ये ४ लाख ८० हजार रुपये हे वाहकाला अधिकचा भत्ता म्हणून दिल्याचा उल्लेख केला आहे.
जलयुक्त शिवार योजनेसाठी राज्य सरकारला पैसे दिलेले असताना पुन्हा दौरा करायची गरज काय? असा प्रश्न निर्माण होतो. विश्वस्त प्रविण नाईक यांनी जानेवारी २०१५ मध्ये तीन दिवसीय मिरज दौरा केला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी दौऱ्याचे बिल लावताना गोव्यातील हॉटेलचे बील लावले आहे.
धक्कादायक म्हणजे, याच काळात विश्वस्त हरीश सणस यांनीही दुसऱ्या भाड्याच्या गाडीने मिरज दौरा केला आहे. तसंच डिसेंबर २०१३ मध्ये सर्व विश्वस्तांनी तिरूपती देवस्थान पाहणीसाठी विमान दौरा करुन या दौऱ्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप इचलकरंजीकर यांनी केलाय.