मुंबई : मुंबईत घर असण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी लाखोंच्या संख्येने नागरिक अर्ज करत असतात. अशाच म्हाडाच्या ८१९ घरांची आज सोडत होणार आहे. त्यामुळे स्वत:चं घर हवं असणा-यांच्या उत्सुकता वाढली आहे. म्हाडा प्रशासन आज जाहीर होणा-या घरांच्या सोडतीसाठी सज्ज झालंय. ८१९ सदनिकांसाठी ६५ हजार १२६ अर्जदार आहेत.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील सदनिकांच्या विक्रीसाठी ही सोडत आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात आज सकाळी दहा वाजता संगणकीय सोडतीला सुरूवात होईल. अत्यल्प उत्पन्न गटासाठी ८ सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता १९२ सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता एकूण २८१ सदनिका आणि उच्च उत्पन्न गटाकरिता ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
१. सोडतीचा निकाल पाहण्यासाठी अर्जदार स्वतः सभागृहात उपस्थित राहू शकतात किंवा सभागृहाखालील मोकळ्या जागेत अर्जदारांना निकाल पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.
२. "वेबकास्टिंग" तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live telecast) बघण्याची सुविधा http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
३. http://www.facebook.com/mhadal2017 या लिंकवर सोडतीचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण
४. सोडतीचा निकाल सायंकाळी सहा वाजता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.