Mhada Lottery 2024 : म्हाडाचं घर, म्हाडाची सोडत म्हटलं की अनेकांचेच कान टवकारतात. कारण, अतिशय झपाट्यानं मालमत्तेचे दर वाढणाऱ्या या शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वप्नांचं घर खरेदी करणं जवळपास अशक्यच ठरत आहे. प्रत्यक्षात या परिस्थितीमध्ये ही सामान्यांच्या मदतीसाठी हजर असणारं एक नाव म्हणजे म्हाडा.
सामन्यांना हक्काचं आणि खिशाला परवडेल इतक्या दरात म्हाडाची घरं आजवर अनेक सोडतींच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यातच आता 2024 मधील आगामी सोडतीची भर पडणार असून या सोडतीमुळं हजारो इच्छुकांना हक्काच्या घराचं स्वप्न साकार करता येणार आहे. Mhada Lottery ची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली असतानाच अचानक या सोडतीतील काही घरांच्या किमतीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, काहींसाठी ही किंमत म्हणजे अशक्यच!
उपलब्ध माहितीनुसार मुंबईतील गोरेगाव येथे असणाऱ्या प्रेमनगर भागात म्हाडा 332 उच्चभ्रू घरांचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीपासूनच या घरांच्या किमती किती असणार यासंदर्भातील उत्सुकता पाहायला मिळाली होती. ज्यानंतर आता त्यांची किंमत अचानक प्रकाशझोतात आल्यानं बऱ्याच चर्चा आणि कुतूहलाचे प्रश्न पाहायला मिळत आहेत.
म्हाडा सोडतीतील मध्यम उत्पन्न गटातील 794 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाच्या घरासाठी 1 कोटी 10 लाख रुपये इतकी किंमत आकारली जाणार असून, उच्च उत्पन्न गटासाठी 979 sqft क्षेत्रफळाच्या घराची रक्कम 1 कोटी 40 लाख रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे.
म्हाडाच्या वतीनं गोरेगावच्या प्रेमनगर भागात हे फ्लॅट असणारी 39 मजली गगनचुंबी इमारत सध्या निर्माणाधीन असून, वर्षअखेरीस हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
जुलैअखेरीस म्हाडाची ही आगामी सोडत जाहीर होणार असून, यामध्येच या कोट्यवधींच्या घरांचाही समावेश असणार आहे. शहराच्या अतिशय कमाल भागात तयार होणाऱ्या या भागातील घरांना आता सोडतीसाठीच्या इच्छुकांकडून नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही घरं असणाऱ्या इमारतींमध्ये कोणकोणत्या सुविधा?
कोट्यवधींच्या घरात असणारी ही घरं असणाऱ्या या इमारतींमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग अशा सुविधा देण्यात येणार आहेत. म्हाडाचं हे 'ड्रीम मॉडेल' आता नेमकं किती प्रतिसाद मिळवतं यावरच रिअल इस्टेट क्षेत्राचंही लक्ष असेल.