MHADA HOMES : काही दिवसांपूर्वीच म्हाडाची सोडत जाहीर करण्यात आली आणि या सोडतीमध्ये इच्छुकांना हक्काचं घर मिळालं. अनेकजण या सोडतीमध्ये विजयी ठरले, तर काहींना निराशेचा सामना करावा लागला. इथं म्हाडाकडून एकिकडे अर्जदारांसाठी विविध पर्याय पडताळले जात असतानाच तिथं आणखी एक दमदार योजना जारी करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर म्हाडाकडून इच्छुकांना घरं देण्यात येमार आहेत. अर्थात घरांची थेट विक्री केली जाणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार या योजनेअंतर्गत 11187 घरांची उपलब्धता असून, त्यासाठी इच्छुकांनी http://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर भेट देत तिथं नोंदणी करणं अपेक्षित आहे. घरासाठीचा अर्ज करताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करावं लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इथं मोबाईल क्रमांक या दोन्ही कागदोपत्री पुराव्यांची जोडला गेलेला असून, त्यासोबतच अर्ज भरताना पासपोर्ट साईज फोटोसुद्धा जोडला जाणं अपेक्षित आहे.
म्हाडानं दिलेल्या माहितीनुसार घरासाठीची रक्कम ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागणार आहे. ज्यानंतर घरांची उपलब्धता असेपर्यंत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याच तत्त्वाअंतर्गत घरांची विक्री केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार असल्यामुळं यामध्ये एजंट किंवा तत्सम कोणताही हस्तक्षेप नसेल असं सांगितलं जात असून, अर्जदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन म्हाडाच्या वतीनं करण्यात आलं आहे.