मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी ८ तासांचा बिशेष मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर घेण्यात येतोय. यासोबतच हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही ६ तास बंद असणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे ‘मेगाहाल’ होण्याची शक्यता आहे.
परळ स्थानकात नव्या फलाटांकरिता रुळांच्या तांत्रिक कामांसाठी सकाळी ९ वाजून ३० मिनिटं ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येतोय. ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर आणि माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेऱ्या या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिरानं धावतील.
याशिवाय हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान ११ वाजून ३४ मिनिटं ते दुपारी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही. चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील वाहतूक ११ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत बंद असेल. प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल, कुर्ला येथून विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर तिकीट, पासवर पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या काळात धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येईल. तर, काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात येईल.