मुंबई : लोकसभा निवडणुकीची राज्याची यादी भाजपने जाहीर केली. मात्र, भाजपच्या मित्र पक्षांना एकही जागा न सोडल्याने ते नाराज होते. भाजपचे मित्र पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. त्यांनी वेगळी चूल मांडली तर ती भाजपसाठी धोक्याची घंटा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढत भाजला साथ देण्यासाठी राजी केले. भाजप - शिवसेना युतीच्या घटकपक्षांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली. यावेळी घटक पक्षांच्या नेत्यांची समजूत काढण्यात आली आहे. या बैठकीला आरपीआय गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि मंत्री महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे नेते आणि मंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान नाही. लोकसभेत घटकपक्षांना सामावून घेता येत नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात आधी घटकपक्षांचं जागा वाटप करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी घटक पक्षांना दिले आहे. युतीच्या घटक पक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले नसलं तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात आधी घटकपक्षांचे जागा वाटप करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. घटक पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्रायंनी वर्षा निवसस्थानी ही बैठक बोलावली होती. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडेंनी विरोधकांवर सडकून टीका केली. ५६ इंच छाती असणाऱ्या नेत्या विरोधात ५६ पक्ष एकत्र आलेत मात्र त्यांचा टिकाव लागणार नाही, असे तावडे म्हणाले. महायुतीमधून निघालेल्या राजू शेट्टींवरही त्यांनी टीका केली.