मुंबई: राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नोकर भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मराठा समाजाचा न्याय आरक्षित आणि संरक्षित केल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. त्यानंतरच मेगा भरती केली जाईल, असे फडणवीसांनी सांगितले.
तसेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान केवळ निदर्शन केलेल्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील. मात्र, हिंसा करणाऱ्या आणि पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवरील खटले आम्ही मागे घेणार नाही. तसे केले तर राज्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्गीय आयोग सर्व बाबी तपासून पाहत आहे. महिनाभरात आयोगाचा आहवाल येणार आहे. त्यानंतर आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत सभागृहात चर्चा होईल. त्यामुळे सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.