मुंबई : सकाळी 7 वाजता विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मराठी कलाकार ही मतदान करण्यासाठी सरसावले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री गितांजली कुलकर्णी या दाम्पत्याने देखील गोरेगाव मतदार केंद्रावर मतदान केले आहे. 'मतदान करताना आपण मतदानाच्या दिवशी किंवा पंधरा दिवस अगोदर कुणाला मतदान करायचं? हा विचार करतो पण हे बरोबर नाही. पाच वर्ष आपण यावर समग्र विचार करायला हवा,' असं अतुल कुलकर्णी यांने सांगितले. तसेच गितांजली कुलकर्णीने देखील सांगितलं की, 'आपण कुणाला मतदान करतो? याचा विचार मतदाराने करायला हवा. पुढची दिशा काय आहे हे देखील आपण बघायला हवं'.
यावेळी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदान केलं आहे. तसेच अभिनेता प्रशांत दामले यांनी वर्सोवा येथे मतदान केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, 'मतदान हा 5 वर्षांनी असणार सण आहे. त्यामुळे तो उत्साहात साजरा केला पाहिजे. संध्याकाळी पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे लवकरच मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच प्रशांत दामले यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक देखील केले आहे.
राजेश शृंगारपुरे यांनी देखील मतदान करून आपला हक्क बजावला आहे.
तसेच अभिनेत्री, यूट्यूबर उर्मिला निंबाळकर हिने देखील मतदान केलं आहे.
अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकरने देखील पाऊस कमी असताना मतदानाचा हक्क बजावला असून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
दिग्दर्शक आणि लेखक समीर विद्वंवसने देखील मतदान केले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.