मराठा समाज आरक्षणाचे काय होणार?, सर्वपक्षीय आमदारांची बैठक रद्द

मराठा क्रांती ठोक मोर्चाची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली. 

Updated: Nov 22, 2018, 07:04 PM IST
मराठा समाज आरक्षणाचे काय होणार?, सर्वपक्षीय आमदारांची बैठक रद्द title=

मुंबई : मराठा क्रांती ठोक मोर्चाची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली. राज्यातील विधानसभेचे २८८ आणि परिषदेचे ७८ आमदारांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. मात्र सभागृहात अजून अहवाल मांडलेला नाही. त्यामुळे अहवालात काय आहे हे माहीत नसल्यामुळे काय भूमिका मांडायची हा सर्वच आमदारांपुढे प्रश्न होता. अहवालावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर आमदार बैठकीला येतील असं सर्व पक्षांच्या प्रमुखांनी सांगितले.

विधानसभेच्या सभागृहात अजून चर्चा न झाल्याने मराठा क्रांती मोर्चाची सर्वपक्षीय बैठक रद्द करून २७ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी सांगितले. सर्व आमदारांनी आरक्षणाला पाठिंबा द्यावा आणि आरक्षण मार्ग कसा मोकळा होईल यावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेय. 

दरम्यान, सकल मराठा क्रांती मोर्चाच्‍या मागण्‍या विधीमंडळात मान्‍य करून घेण्‍यासाठी आणि दबाव वाढविण्यासाठी २६ नोव्‍हेंबर रोजी मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा आयोजित करण्‍यात आला आहे. त्‍यानिमित्‍त मराठा क्रांती मोर्चाच्‍या राज्‍यभर संवाद यात्रा सुरु झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून कोकण विभागाची संवाद यात्रा, किल्‍ले रायगडच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या पाचाड इथून सुरु झाली. तसेच शेतकरयांना हमीभाव मिळावा यासह इतर मागण्‍या मान्‍य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चाच्‍यावतीन देण्यात आला आहे.