मुंबई : नाबार्डच्या चौकशी अहवालातून मुंबै बँक कारभाराच्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबै बँकेत कोट्यवधी रूपयांचा मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.
मनी लॉन्ड्रिंगमाध्यामातून बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकरांच्या मेहुणा आणि एका भाजप कार्यकर्त्याच्या खात्यात हा पैसा वळवण्यात आल्याचं दिसून येतंय. मुंबै बँकेच्या पदाधिका-यांबरोबबर त्यांच्या नातेवाईकांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यात मागे राहिलेले नाहीत.
झी 24 तासने यापूर्वीच बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकरांचा मेहुणा महेश पालांडे आणि भाजप कार्यकर्ता अमोल खरात यांनी बँक मॅनेजरना हाताशी धरून मोठा गैरव्यवहार केल्याचं समोर आणलं होतं. त्यावर नाबार्डने आपल्या चौकशी अहवालात शिक्कामोर्तब तर केलंच.
शिवाय इथं मनी लॉड्रिंगसारखा धक्कादायक प्रकार झाल्याचं निरीक्षण देखील नोंदवलंय. ठाकूर व्हिलेज आणि दहीसरच्या अशोकवन शाखेमध्ये प्रविण दरेकरांचा मेहुणा महेश पालांडे आणि भाजप कार्यकर्ता अमोल खरात या दोघांनी तब्बल १६० खाती उघडण्यासाठी शिफारस केलीय. धक्कादायक बाब म्हणजे दरेकरांच्या मेहुण्याची तब्बल 30 लोन अकाऊंटस आहेत. ही सर्व खाती बोगस असल्याची शंका नाबार्डनं व्यक्त केलीय.
ही खाती केवळ गैरव्यवहार करण्यासाठीच उघडली गेली असल्याची दाट शक्यता नाबार्डने व्यक्त केलीय. या खात्यांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे पर्सनल लोन करण्यात आलं आणि त्यानंतर या दोघांच्या खात्यांवर हा पैसा वळवण्यात आला. या दोघांच्या खात्यांवर संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचंही नाबार्डने नमूद केलंय.
तसंच प्रविण दरेकरांचा मेहुणा महेश पालांडे यांच्या पत्नीच्या खात्यावरही इतर खात्यामधून पैसा वळता झाल्याचं नाबार्डने आपल्या अहवालात म्हटलंय. हे एक नियोजनबद्ध मनी लॉड्रिंग असून वैधानिक प्राधिकरणाकडून चौकशीची गरज व्यक्त केलीय. तसंच बँकेने याप्रकरणी तात्काळ एफआयआर दाखल करायला हवा, असंही नाबार्डने म्हटलंय. त्यामुळंच शिवसेनेने या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशीची मागणी केलीय.
हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर बँकेने या दोन्ही शाखांच्या व्यवस्थापकांना निलंबित केलं असलं तरी गैरव्यवहाराचे लाभार्थी मात्र पदाधिका-यांच्या आशीर्वादानं मोकाटच आहेत. नाबार्डच्या चौकशी अहवालात एवढं सगळं या मनी लॉड्रिंगबद्दल नमूद केलं असलं तरी बँक अध्यक्षांच्या मते असं काही झालेलंच नाही.
सर्वत्र सत्ता असेल तर काहीही केलं तरी चालतं, ही भावना बँक पदाधिका-यांमध्ये तर दिसून येतच होती. आता ती बँक पदाधिकाऱ्यांच्या सग्यासोय-यांमध्येही दिसून येतीये. जे सहकार क्षेत्रासाठी घातक आहे.