Manipulation Of Stock Market: 'इंडिया' आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांविरुद्ध तक्रार केली आहे. आज मुंबईमधील 'सेबी'च्या कार्यालयामध्ये जाऊन 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत एक्झिट पोल घेणाऱ्या संस्था, निकालांआधी बाजारामध्ये मोठ्याप्रमाणात झालेली खरेदी, त्यानंतर निकालाच्या दिवशी बाजार पडल्याने झालेलं लाखो कोटींचं नुकसान या साऱ्याचं राजकीय नेत्यांशी काही कनेक्शन आहे का याचा तपास केला जावा अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना निकालाच्या तारखेच्या म्हणजेच 4 जून अधिक शेअर्स खरेदी करण्याचं विधानं अनेकदा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही तक्रार करण्यात आली आहे.
शिंदे गटाचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांच्याबरोबरच सागरीका घोष, साकेत गोखले, तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी हे सर्वजण 'इंडिया' आघाडीच्यावतीने 'सेबी' कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी आपली बाजू मांडली. जाणूनबुजून शेअर बाजारासंदर्भातील व्यवहारांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. भेटीला गेल्यानंतर सुरुवातीला 'सेबी'च्या अधिकाऱ्यांनी 'सेबी'चं काम कसं चालतं. 'सेबी' नेमकं काय करते याची माहिती दिल्याचं सांगितलं. "आम्हाला 'सेबी'वर विश्वास असल्याने आम्ही तपासाची मागणी करण्यासाठी आल्याचं आम्ही 'सेबी'च्या अधिकाऱ्यांना सांगितलं," असं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
'सेबी'च्या अधिकाऱ्यांच्या या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना तृणमूलचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. "लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलमधील आकडेवारीनंतर शेअर बाजार वधारला. या एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांचे राजकीय नेत्यांबरोबर काही संबंध आहेत का? पडलेला बाजार एक्झिट पोलच्या दिवशी वधारला आणि नंतर पुन्हा पडला. 24 तासांमध्ये गुंतवणूदारांना 30 लाख कोटींचं नुकसान झालं. मात्र चंद्रबाबू नायडूंच्या पत्नीला 521 कोटींचा नफा झाला. इतरही अनेक उदाहरणं आहेत ज्यात राजकीय नेते किंवा त्यांच्या कुटुंबियांनी भरपूर पैसा आणि नफा कमवला. निवडणुकांदरम्यान अमित शाहा अनेक सभांमध्ये अनेकदा म्हणाले की 4 तारखेआधी शेअर्स खरेदी करानंतर नफा मिळेल असं अनेकदा म्हणाले. आता ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का?" याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.
विरोधक हेच सांगत होते की एक्झीट पोल सरकारधार्जिण्या प्रसारमाध्यमांनी केलेले आहेत, असंही कल्याण बॅनर्जी म्हणाले. "आम्हाला लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. त्यामुळेच तपास गरजेचा आहे. कोणी हा गोंधळ घातला आणि का घातला? असेच एक्झिट पोल सुरु राहिले तर भविष्यात पुन्हा असं घडू शकतं. राजकीय नेत्यांन नफा मिळवून देण्यासाठी हे एक्झिट पोल होतात का? या सर्व संस्थांमध्ये कोण लोक आहेत? त्यांचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे का? ते कशाच्या आधारे एक्झिट पोल घेतात?" या साऱ्याचा तपास झाला पाहिजे अशी इंडिया आघाडीची मागणी असल्याचं 'सेबी'ला कळवण्यात आल्याचं कल्याण बॅनर्जींनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या तक्रारीमुळे अमित शाहांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आता या प्रकरणात सेबी काय कारवाई करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#WATCH | TMC leader Kalyan Banerjee says, "Earlier we wrote letters to the chairpersons and we sought for an appointment regarding the manipulation scam which happened on the back of misleading exit poll for the Lok Sabha 2024. We have come here but the chairperson is not there.… pic.twitter.com/3tHdcZnMdl
— ANI (@ANI) June 18, 2024
'सेबी'कडे तक्रार केल्यानंतर इंडिया आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.