मुंबई : मालेगाव स्फोटाची नियमित सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने एनआयएला आदेश दिलेत. २००८ सालच्या मालेगाव स्फोट खटल्याची नियमित सुनावणी सुरू करण्याचे आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणी संशयीत आरोपी समीर कुलकर्णी यांच्या याचिकेवर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
१५ एप्रिल २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट खटला वेगाने चालविण्याचे आदेश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही हा खटला अनेक वर्ष प्रलंबित होता. या विरोधात समीर कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रलंबित असलेल्या या खटल्याची सुनावणी तातडीने करवी, अशी विनंती याचिकाकर्त्यांमार्फत न्यायालयात करण्यात आली होती.
सोमवारी या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू करण्यात यावी असे आदेश खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिले आहेत. सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू तर १००हून अधिक जखमी झाले होते.