महाविकासआघाडीत विधानपरिषदेच्या ६ जागा लढवण्याबाबत हालचाली

महाविकासआघाडीत सहा जागा लढवण्याबाबत हालचाली 

Updated: May 5, 2020, 04:09 PM IST
महाविकासआघाडीत विधानपरिषदेच्या ६ जागा लढवण्याबाबत हालचाली title=

मुंबई : महाविकासआघाडीत सहा जागा लढवण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस दोन जागांसाठी आग्रही आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला ४, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला २ तर काँग्रेसला १ जागा मिळणार असल्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावा केला होता. मात्र काँग्रेसला दोन जागा हव्या आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीने ६ जागा लढवाव्या असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यामुळे याबाबत संध्याकाळी होणाऱ्या महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

२१ मे रोजी विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी २९ मतं हवी आहेत. निवडणुकीच्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

११ मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून शिवसेनेची २ नावं निश्चित झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड या मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांच्या मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या देखील झाल्याचं कळतं आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारांची नावं जाहीर झालेली नाहीत. त्यातच आता काँग्रेसला आणखी २ जागा हव्या आहेत. 

भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यांच्या जागी आता माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. तसंच विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांना देखील संधी मिळू शकते.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्याने सत्तेची गणितं बदलली आहेत. विधानपरिषदेत महाविकासआघाडीचे ५ तर भाजपचे ४ आमदार जिंकून जाणार आहेत. चौथ्या जागेसाठी काही मतं कमी पडतील त्यामुळे भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत घेण्याच्या तयारीत आहे.