पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे.   

Updated: Aug 27, 2024, 10:01 AM IST
पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?  title=
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 to be held in november latest update

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहिले आणि त्यानंतर या निवडणुकीचा निकाल लागता लगबग सुरू झाली ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेला धक्का पाहता सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत सरशी मिळवण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्नांची सुरुवात केली आणि अखेर निवडणूक केव्हा होणार, तारखा कोणत्या असणार या मुद्द्यावर येऊन ही चर्चा थांबली. 

मागील काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि आता मात्र विद्यमान विधानसभा विसर्जित झाल्याशिवाय निवडणूक होणं जवळपास अशक्यच असल्याचं स्पष्ट होताना दिसलं. परिणामी निवडणुकीच्या तारखा डिसेंबरवर गेल्याची चिन्हं दिसू लागली. आता मात्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यातच पार पडणार असल्याचं एका आदेशामुळं सूचित होत आहे. 

पोलिसांच्या बदलीशी थेट संबंध? 

(Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांच्या बदल्यांचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनीच यासंदर्भातील माहिती उच्च न्यायालयात दिली. 

लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा त्या पोलिसांना पूर्वीच्याच पोलीस ठाण्यात पाठवा, असे आदेश 19 जुलै 2014 रोजी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) दिले आहेत. 

मॅटच्या या आदेशाविरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात याचिका केली आणि त्यामागोमाग न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सदर याचिकेवर सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने 31 जुलै 2024 रोजी राज्य शासनाला विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती कळवली.  ज्यामुळं आता नोव्हेंबर-2024 च्या आसपास विधानसभा निवडणूक होईल अशी चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली! पैसे तयार ठेवा, 'या' तारखेला लाँच होतायत आयफोन 16 चे चार मॉडेल 

किंबहुना निवडणुकीच्याच धर्तीवर पोलिसांच्या बदल्या करा, असं आयोगाने सांगितलं आहे. मॅटच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी बदली झालेल्या पोलिसांना त्यांच्या मूळ जागेवर पुन्हा पाठवल्यास विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने बदल्यांची प्रक्रिया करावी लागेल. परिणामी लोकसभा निवडणुकीला बदली झालेल्या
पोलिसांच्या बदल्या तशाच राहणार आहेत आणि याच कारणास्तव आता विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्येच पार पडण्याची दाट शक्यता आहे.