दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. कोरोना संख्या कमी असलेल्या भागात सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.
ऑगस्टमध्ये ब्रेक द चैन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. पण आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत.
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याअंतर्गत हॉटेल्स सुरु करण्यात आले आहेत, दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे.
टास्क फोर्सबरोबर झालेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागावर सोपवण्यात आला होता. यानंतर आता शिक्षण विभागाकडून चाचपणी सुरु करण्यात आलेली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक घेणार असून या बैठकीनंतर राज्यातील शाळा कधी सुरु होणार हे स्पष्ट होणार आहे.
सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. पण ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य पद्धतीने शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत शिक्षण विभाग आहे.