मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. या निवडणूकीचं मतदान शुक्रवारी झालं. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान करण्यात आलं. या निवडणुकीत मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी झालेत.
सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशी पाहायला मिळाली. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंड विजयी झाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीची 9 ते 10 मतं मिळवण्यात यश आलंय. महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 मतं मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना 27 मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला. धनंजय महाडिक यांना 41 मते मिळाली.
मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली.
त्यानंतर संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्त मिळाल्यामुळे त्यांचा विजय झाला आहे.