Rashmi Uddhav Thackeray : त्या आल्या... त्या चालल्या... आणि त्यांनी मोर्चेकऱ्यांचं मन जिंकलं. फिकट गुलाबी रंगाची, चंदेरी पदराची साडी नेसून रस्त्यावर उतरलेल्या रश्मी ठाकरे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महामोर्चात (Maha Morcha) त्याच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. एखाद्या राजकीय मोर्चात जाहीरपणे सहभागी होण्याची आणि थेट मोर्चात चालत जाण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. त्यांच्या एन्ट्रीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पायी चालत चालत त्यांनी मोर्चाच्या समारोपाचं ठिकाण गाठलं.
मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते एका ठिकाणी भोजन करत होते. रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) स्वत: थांबून आस्थेने त्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली. केवळ शिवसैनिकच (Shiv Sena) नव्हे, तर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्तेही त्यांच्या सहभागानं भारावून गेले होते. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनाही रश्मी ठाकरेंसोबत सेल्फीs(Selfie) काढण्याचा मोह आवरला नाही. अलिकडच्या काळात रश्मी ठाकरेंचा शिवसेनेतला वावर वाढल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र थेट मोर्चात रस्त्यावर उतरण्याची त्यांची पहिलीच वेळ...
'मातोश्री'ची राजकीय मोर्चेबांधणी?
याआधी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरवर त्यांचा फोटो झळकला होता. तर नवरात्रौत्सवात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बालेकिल्ल्यातच त्यांनी धडक दिली होती. ठाण्यात त्यांनी धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dhighe) यांच्या देवीच्या दर्शनाला जाऊन आरती केली. ठाण्याहून परतताना त्यावेळी जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांच्या (Sannay Raut) घरी जाऊन कुटुंबीयांची मायेनं विचारपूस केली. इतकंच काय तर राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन करणाऱ्या फायर आजींच्या भेटीलाही त्या उद्धव ठाकरेंसोबत पोहोचल्या होत्या.
हे ही वाचा : 'ज्यांच्या नाकाखालून सरकार नेलं, त्यांनी...' देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
रश्मी ठाकरे मैदानात उतरणार?
आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) शिवसेना ठाकरे गटाला बळ देण्यासाठी रश्मी ठाकरे स्वतः पदर खोचून रणमैदानात उतरल्याचं मानलं जातंय. बाळासाहेबांची सूनबाई, उद्धव ठाकरेंची खंबीर पत्नी, आदित्य आणि तेजसची मातोश्री या भूमिका पार पाडणाऱ्या रश्मी ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय होणार का, याकडं आता तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.