'काहीतरी वेगळं राजकारण दिसतंय... सावध व्हा!' मिलिंद नार्वेकरांना आलेल्या त्या पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख, नेमका हेतू काय?

Maharashtra Politicsl News : पत्रास कारण की... मिलिंद नार्वेकर यांना आलं एक पत्र. महत्त्वाची बाब अधोरेखित करणारं हे पत्र लिहिलं कोणी? राजकीय वर्तुळातील मोठी बातमी.   

कृष्णात पाटील | Updated: Aug 16, 2024, 10:09 AM IST
'काहीतरी वेगळं राजकारण दिसतंय... सावध व्हा!' मिलिंद नार्वेकरांना आलेल्या त्या पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख, नेमका हेतू काय?  title=
Maharashtra Political news internal disputes in mahavikas adgadi shivsena thackeray group letter to milind narvekar revealed everything

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता खऱ्या अर्थानं काऊंटडाऊन सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. पावसाळा आटोपल्यानंतर दिवाळीमागोमागच राज्याच निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी राज्यात अनेक राजकीय घडामोडींना आणि उघडपणे मतमतांतरं व्यक्त करण्याला सुरुवात झाली आहे. एकिकडे काही नेत्यांच्या येण्यानं महायुतीमध्ये वादंग माजण्याची चिन्हं असतानाच दुसरीकडे मात्र मविआमध्येही अंतर्गत धुसफूस असून आता त्याचे पडसाद जाहीरपणे समोर येऊ लागले आहेत. 

शुक्रवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाविकास आघीडीचा महत्त्वाची बैठक आणि मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला असून, मविआचे नेते या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत मार्गदर्शनही करणार आहेत. उद्धव ठाकरे यावेळी काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष राहील. पण, त्याआधी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सावध करणारं एक पत्र समोर आलं आणि मविआतील अंतर्गत धुसफूस उघड झाली. 

हेसुद्धा वाचा : निवडणूक न लढवता ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात मग आम्ही पण... अजित पवार रोखठोक

 

महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्तं प्रचारासाठी वापर करून घेतील आणि स्व:ताच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणत, पुन्हा जे लोकसभा निवडणुकीत घडलं तेच आता विधानसभा निवडणुकीतही घडेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाला मागे टाकेल… अशा इशारा देणारं पत्र एका शिवसैनिकाने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना पाठवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आलीय.

'वेगळं राजकारण दिसतंय... ' शिवसैनिकाचं पत्र जसंच्या तसं

'मिलिंद भाई, 
जर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल महाविकास आघाडी तरच उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही. 

लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील... मुख्यमंत्रीपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे.  यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे. त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तिच रणनिती ठेवावी....'

उद्धव ठाकरे प्रचारप्रमुख... 

दरम्यान, उद्धव ठाकरे हेच राज्यातील माहविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार असला तरीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आताच जाहीर होणार नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे. मविआचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेतला जाणार असून, काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना यासंदर्भातील माहिती दिली होती.