अजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, चव्हाण सेंटरपासून शंभर पाऊल दूर...पाहा कुठे आहे

अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केलाय. जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करणयात आली. तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलाय. आता अजित पवार गटाचं नवीन कार्यालयही स्थापन झालंय.

Updated: Jul 3, 2023, 09:37 PM IST
अजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, चव्हाण सेंटरपासून शंभर पाऊल दूर...पाहा कुठे आहे title=

Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच, पक्ष आणि चिन्ह आमच्याबरोबर आहे असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांना (Sharad Pawar) आव्हान दिलंय. मात्र त्याचवेळी शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे विसरलात का, असा प्रश्नही अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत केला. आता अजित पवार यांनी पक्षाचं नवं कार्यालय देखील घेतलं आहे. मंत्रालय समोर A/5 बंगला अजित पवारांचं आता नवं कार्यालय असेल. उद्या म्हणजे मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं (New Party Office) मुंबईत उदघाटन होणार आहे. दुपारी एक वाजता अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान
मुंबईच्या चर्चगेटमध्ये असलेलं वाय बी चव्हाण सेंटर महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र मानलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्हाय बी चव्हाण सेंटरमधून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता व्हाय बी चव्हाण सेंटरपासून जवळच अजित पवारांचं नवं पक्ष कार्यालय असणार आहे. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून त्यानंतर घडलेल्या सर्व घडामोडींचा साक्षीदार हे वायबी चव्हाण सेंटर आहे. 

दिल्लीतल्या कार्यालतही फूट
दुसरीकडे दिल्ली राष्ट्रवादीत मोठी फूट पडलीय. दिल्लीतल्या कार्यालयातून प्रफुल्ल पटेलांचा फोटो हटवल्यानंतर पटेल गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दिल्लीतील कार्यालयावर प्रफुल्ल पटेल यांच्या गटानं दावा केलाय. पोलिसांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाला. पोलिसांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना हाताला धरुन बाहेर काढल्याचा दावाही करण्यात आला.  मात्र आपण या कार्यालयातून हटणार नाही, असा दावा राष्ट्रीय युवा अध्यक्ष सोनिया दुहान यांनी केलाय. 
 
विधीमंडळात धाव
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विधीमंडळासमोर धाव घेतलीय. विधानसभा अध्यक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे 7 ते 8 अर्ज दाखल झालेत. त्यातल्या याचिका आणि तक्रार अर्ज तपासल्यानंतर अध्यक्ष पुढची कार्यवाही करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून पुढची कार्यवाही करण्याचं विधीमंडळासमोर आव्हान आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भात पेच निर्माण झालाय. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधात अशा दुहेरी भूमिकेत असल्याने नवा पेच आहे. नेमका पक्ष कुणाचा? यावर निर्णय घेण्याचे अध्यक्षांसमोर आव्हान असेल..