Sharad Pawar on Maharashra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारही (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आलं आहे.
यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्या वेळेला विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले, ते इथे आल्यानंतर मला खात्री आहे, ज्या पद्धतीने त्यांना नेलं गेलं, त्याची वस्तूस्थिती ते लोकांना सांगतील आणि इथे आल्यानंतर आपण अजूनही शिवसेनेबरोबर आहोत हे स्पष्ट करतील. बहुमत सिद्ध करण्यासाठी बंडखोरांना मुंबईत यावंच लागेल असं शरद पवार यांनी म्हटलंय.
अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखं राष्ट्रीय संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केलं. ते सर्व पाहिल्यानंतर मविआचा प्रयोग फसला आहे असं म्हणणं म्हणजे राजकीय अज्ञान असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
सरकार अल्पमतात आहे की नाही हे विधानसभेत ठरेल, विधानसभेत जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा स्पष्ट होईल हे सरकार बहुमतात आहे, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
अशी स्थिती यापूर्वी महाराष्ट्रात अनेकदा पाहिली आहे, या परिस्थितीतूनही हे सरकार व्यवस्थित बाहेर पडेल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार सुरळीत सुरु आहे हे संपूर्ण देशाला कळेल असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं.
बंडखोर आमदारांच्या नेत्यांचं म्हणणं आहे, आघाडीत आम्ही गेलो पण काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात आमच्या मनात नाराजी आहे, त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलंय मुंबईत येऊन आपली भूमिका मांडा. त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आम्ही नाराज नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
बंडखोरीमागे भाजप आहे असं वाटत नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवारांनी महाराष्ट्राची जी स्थिती आहे ते पाहून विधान केलं असावं, पण अजित पवार यांना इथली स्थिती माहितीए, पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती आम्हाला माहित आहे.
एकनाथ शिंदे यांची मुलाखत पाहिली त्यात त्यांनी असं म्हटलंय आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे, माझ्याकडे देशाच्या सर्व पक्षांची यादी आहे, या यादीत भाजप, मायावती, कम्युनिस्ट पार्टी, सीपीएम, इंडियन नॅशनल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सहा पक्षांची अधिकृत यादी निवडणुक आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे. आता तुम्हीच सांगा भाजप सोडून बाकीच्या पक्षांचा यात हात आहे का, त्यांना यातले कोण पाठिंबा देईल का असं सांगत शरद पवार यांनी यामागे भाजपचं असल्यचं स्पष्ट केलं आहे.