Maharashtra Polticis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानी येणाऱ्या लोकांच्या खानपान सेवांसाठी वर्षभरात करण्यात येणाऱ्या खर्चाबाबतची माहिती समोर आली आहे. दहा महिन्यांपूर्वी या दोन सरकारी बंगल्यावर मान्यवर अतिथींच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासाठी आता वार्षिक दीड कोटी रुपयांवर एका केटरची नियुक्ती केली आहे. यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' येथील पाहुणचारावर सरकारला कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याची टीका विरोधकांकडून केली आहे. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर मंत्रालय आणि सरकारी निवासस्थानांवर गर्दी होत होती. याचा सरकारी तिजोरीवर परिणाम होत असल्याचे म्हटलं जात होतं. आरटीआयच्या माहितीनुसार, सरकार स्थापन झाल्यापासूनच्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केटरिंग सेवेवर 2 कोटी 38 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आलं होतं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राज्य सरकारने एप्रिल 2025 पर्यंत देवगिरी या अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानासाठी छत्रधारी केटरर्सची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता वर्षा, सागर आणि देवगिरी या तीनही बंगल्यांवर खानपानाचा एकूण खर्च वर्षाला सुमारे 6.5 कोटी रुपये असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एप्रिल 2023 मध्ये विरोधात असताना अजित पवार यांनीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर केवळ चार महिन्यात खानपानावर तब्बल 2.68 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे म्हटलं होतं.
गेल्या वर्षी, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी छत्रधारी केटरर्स आणि श्री सुख सागर हॉस्पिटॅलिटीची नियुक्ती करणारा जीआर जारी केला होता. त्यानंतर आता अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर देखील छत्रधारी केटरर्स मार्फत पाहुणचार केला जाणार आहे.
देवगिरी बंगल्यावर या केटरर्समार्फत 44 वस्तू पुरवल्या जाणार आहेत ज्यात गरम आणि थंड पेये आणि स्नॅक्सचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रीयन कचोरी (15 रुपये), साबुदाणा वडा (15 रुपये), दही वडा (15 रुपये), वडा सांभर आणि टोमॅटो ऑम्लेट (28 रुपये), मसाला डोसा (20 रुपये) आणि व्हेज आणि चिकन सँडविच (18-20 रुपये) मिळणार आहे. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी थाळी (75 आणि 98 रुपये), शाकाहारी आणि मांसाहारी चिकन आणि मटण बिर्याणी (25 आणि 35 रुपये) आणि बुफे (160 रुपये) हे पदार्थ देखील पुरवले जाणार आहेत.
दरम्यान, वर्षा आणि सागर बंगल्यावर येथे समान दर लागू आहेत. तसेच जर खाद्यपदार्थ मान्य केलेल्या दरांव्यतिरिक्त इतर दराने विकले गेले, तर त्याचे बिल मंजूर केले जाणार नाही, असे जीआरमध्ये म्हटलं होतं.