कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन खरेदी करणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Updated: Jun 6, 2020, 07:38 PM IST
कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन खरेदी करणार title=

मुंबई :  कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर या इंजेक्शनचा उपयोग चांगला होऊ शकेल, त्यामुळे राज्य शासनाने १० हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.

आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तीकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडणारे नसल्याने शासनाने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणीत पद्धत (एसओपी) तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

धारावी येथे बुधवारी १९ आणि गुरुवारी २३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी धारावी येथे १७ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे एकूण १४४२ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी मुंबईत किमान ४८ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत सध्या रूग्णांची संख्या ४४ हजारांच्या वर गेली आहे. धारावी कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत होती. पण गेल्या काही दिवसांपासून येथे परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे डोर-टू-डोर स्क्रिनिंग केले गेले. शिबिरे उभारली गेली, पोलिसांनी कठोर नियम लागू केले, चाचणीची संख्या वाढविली गेली. त्यानंतर येथे कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी झाले