मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांसह पालकांनीही नाराजी व्यक्त केली होती. शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडणार आहेत. रुग्ण संख्या घटू लागल्यामुळे शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री या प्रस्तावावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
शिक्षक संघटना आणि पालक संघटनांबरोबर चर्चा झाली तसंच अनेक पत्र आणि निवेदनं आम्हाला मिळाली, सर्वांचं म्हणणं होतं की शाळा सुरु झाल्या पाहिजेत. पण मधल्या काळात कोविड प्रकरणाता मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. त्यामुळे शासनाने निर्णय घेतला होता, की शाळा, महाविद्यालयं सुरु करु नयेत.
या काळात तज्ज्ञांशी चर्चा केली आणि त्यानंतर सर्वांचं असं म्हणणं आहे की ज्या भागात कोविडची संख्या कमी आहे, त्या भागात स्थानिक पातळीवर शाळा सुरु करण्याचे अधिकार द्यावेत, तशा प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. सोमवारपासून शाळा सुरु करण्यावर विचार करावा असं यात सांगण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
एकदा निर्णय आला की शाळा सुरु करण्यातबाबतचा विचार केला जाईल. आमचा मोठा भर असणार आहे तो 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या वॅक्सिनेशनवर आहे. शालेय स्तरावर वॅक्सिनेशन करावं अशी विनंतीही करण्यात आलेली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोनही डोस घ्यावेत असं आवाहन केलेलं आहे.
प्रस्तावात नेमकं काय?
प्री प्रायमरी आणि पहिली ते 12 शाळा त्या भागातील कोविड परिस्थिती पाहून सुरु कराव्यात अशी विनंती या प्रस्तावात करण्यात आलेली आहे. ज्या भागात रुग्णसंख्या कमी आहे त्या भागात नियमांचं पालन करुन शाळा सुरु करायच्या आहेत. किती विद्यार्थ्यांना बोलवावं, याचं नियोजनही शाळांनी करायचं आहे. विद्यार्थ्यांना एकदिवस आड बोलवावं, पालकांची संमती असावी याबाबतही शाळांना आवाहन केलं आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे हे मुख्य लक्ष्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.