देशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया

 राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.

Updated: Dec 6, 2021, 06:34 PM IST
देशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय. आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. या नव्या विषाणूबाबत अनेकांमध्ये भितीचं वातावरण आहे. हा ओमायक्रॉनचा विषाणू कोणासाठी धोकादायक आहे, आणि कोणासाठी नाही, याबाबतची माहिती टास्क फोर्सचे (Task Force Chief) प्रमुख संजय ओक (Sanjay Oak) यांनी दिलीय. (maharashtra corona task force head dr sanjay oak give reaction about corona new variant omicrone booster dose lockdwon school reopening) 

संजय ओक काय म्हणाले? 

ओमायक्रॉन देशाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी त्याची भिती बाळगण्याची गरज नाही. ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाल्याच्या केसेस आलेल्या नाहीत. लसवंतांमध्ये कमी लक्षणं आहेत. यात स्नायूंमध्ये दुखण्याचं प्रमाण अधिक आहे. याचा प्रसार होण्याची क्षमता मात्र डेल्टापेक्षा खूप अधिक आहे.

ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला?

"लस न घेतलेल्यांना ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. तसेच राज्यात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु आहे. त्याआधी विद्यार्थ्यांना लस देऊन त्यांना संरक्षित करणं गरजेचं आहे", असं ओक यांनी नमूद केलं.  

"राज्यातील 12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणाची परवानगी मिळावी, यासाठी आम्ही केंद्राला विनंती करतोय. ही परवानगी 15 डिसेंबरपर्यंत मिळेल", असा विश्वास ओक यांनी व्यक्त केला. 

लस, मास्क आणि सोशल डिस्टन्स ही त्रिसूत्री महत्वाची

"शाळांच्या बाबतीत सध्या तरी पुनर्विचार नाही. वैद्यकीय क्षेत्राचा हा केवळ निर्णय नाही. एकत्रित निर्णय घेतलेला आहे. यावर माघार होणार नाही", असं ओक यांनी नमूद केलं. 

महाराष्ट्राने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परदेशातून येणाऱ्यांची RTPCR चाचणी बंधनकार करण्यात आली होती.  

यामध्ये पॉझिटिव्ह असलेल्यांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि निगेटिव्ह असलेल्यांना ७ दिवस होम क्वारंटाईनची करण्याबाबत तरतूद करण्यात आली होती. 

मात्र याला कडाडून विरोध करण्यात आला. आम्ही जे म्हणत होतो, ते कालच्या उदाहरणावरुन खरं ठरलं. नव्या विषाणूचा धोका कमी असलेल्या देशातून रुग्ण येतायेत.  

पाश्चिमात्य देशातील प्रत्येक गोष्ट कॉपी पेस्ट करता येत नाहीत. नियम आणि उपाय हे आपल्यासाठी तयार करावे लागतात.

झी 24 तासच्या माध्यमातून लोकांना विनंती आहे की, मास्क, लस आणि सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे. स्वत:च्या इच्छा आकांक्षांना बंधन घालावे. आजचा काळ काळजीचा आहे, असं आवाहन ओक यांनी केलं. 

बूस्टर डोस केव्हापासून?

कोमॉर्बिड व्यक्तींना धोका आहे. कारण ते लवकर बळी पडतात. लसीची परिणामकारकता कमी होत जाते. म्हणून आम्ही बूस्टर डोसची शिफारस केली आहे. अन्य देशांमध्ये बुस्टर डोस सुरू झालेत. लवकरच केंद्र सरकार यासाठी परवानगी देईल अशी अपेक्षा आहे.

लसीची परिणामकारकता किती? 

लस 100 टक्के परिणामकारक नसली तरी शून्य टक्के युझलेस आहे,असंही नाही, असं ओक यांनी सांगितलं.

लॉकडाऊनबाबत काही विचार?

लॉकडाऊन आणि निर्बंधाचा विचार अजिबात नाही. आम्ही स्वनिर्बंधाचा आग्रह धरत आहोत. टास्क फोर्सची आज (6 डिसेंबर)  बैठक आहे. ज्यात जगात काय चाललंय याचा आढावा घेतला जाईल.