मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेले काही दिवस पाठीचं आणि मान दुखीचा त्रास होत आहे. हा त्रास अधिक बळावू नये यासाठी H N रिलायंन्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सूचवला आहे. मात्र शस्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला आहे. पण शस्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत. त्यांनी सध्या तरी शस्त्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना हा त्रास जाणवत असून त्यांनी भेटीगाठीही टाळल्या आहेत. काल पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला दिसला. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पाठदुखी आणि मानेच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्यामुळे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठदुखी आणि मानेचा स्नायूच्या दुखापतीमुळे पट्टा लावण्यात आला असल्याचं सांगण्यातआलं आहे. तसंच त्यांची तब्येत आता ठीक असल्याची माहिती दिली आहे.