"मी आणि देवेंद्रजी मिळून राज्यात 200 जागा मिळवून दाखवू", एकनाथ शिंदे यांचं चॅलेंज

भाजपा आणि शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. 

Updated: Jul 4, 2022, 04:32 PM IST
"मी आणि देवेंद्रजी मिळून राज्यात 200 जागा मिळवून दाखवू", एकनाथ शिंदे यांचं चॅलेंज title=

Maharashtra Vidhansabha: भाजपा आणि शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.  शिंदे गट आणि भाजपाला 164 मतं आणि महाविकास आघाडीला 99 मतं पडली. विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी झालेल्या अजित पवार यांनी शिंदे गटाला सुनावलं होतं. शिवसेना सोडून गेलेले परत निवडून येत नाही असा टोला अजित पवार यांनी हाणला होता. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.

"आम्हाला म्हणतात की, शिवसेना सोडून गेलेल संपले. परंतू त्यांना मी सांगू इच्छितो की, मी हिंदुत्वाच्या विरोधात गेलो नाही. हिंदुत्वासाठीच भूमिका घेतली. मी आणि देवेंद्रजी मिळून आता आम्ही राज्यात 200 जागा मिळवून दाखवू. माझ्याबरोबर जितके आले तितके मर्जीने आले. पुढच्या वेळी भाजपा आणि आमचे 200 आमदार निवडून येतील. माझ्यासोबत आलेल्या 50 पैकी एकही आमदार पडू देणार नाही. हा माझा शब्द आहे आणि जर निवडून आले नाही तर मी गावी शेती करेन.", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

"भाजपच्या वरिष्ठांनी शिवसेना भाजप युती सरकार यावं यासाठी प्रयत्न केले. आम्ही आता काम केलं तर पुन्हा आमचे 200 हून अधिक आमदार निवडून येतील. नाही तर अजित दादांनी 100 चे टार्गेट ठेवलेच होते.", असा मिश्किल टोला एकनाथ शिंदे यांनी अजित दादांना लगावला. "शिवसेना सत्तेत असूनही शिवसैनिकांवर मोक्का लावण्यात आला. परंतू महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांना निधी देखील मिळत नव्हता. मी स्वतः माझ्या विभागातील काही निधी स्थानिक शिवसैनिकांना देऊन त्यांचं मन हलकं करीत होतो. महाविकास आघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना, जिल्हाप्रमुखांपासून ते शाखाप्रमुखापर्यंतच्या शिवसैनिकांना ताकद देणं गरजेचं होतं. ते झालं नाही. सर्वसामान्य शिवसैनिक माझ्याकडे पत्र घेऊन आले की, मी सरळ अधिकाऱ्यांना फोन लावतो. आणि कामं पूर्ण करायला सांगतो. पत्र वगैरे नाही. परंतू थेट कामावर कारवाई करायला सांगतो. तरच लोकं आम्हाला निवडून देतील. आमचे 200 आमदार नक्की निवडून येतील.", असंही त्यांनी पुढे सांगितलं.