CM Eknath Shinde in Davos : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणजे पांढरा शर्ट आणि पांढरी पँट. पांढरेशुभ्र कपडे हीच त्यांची ओळख. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अशी राजकारणात एकेक पायरी ते वर चढत गेले. मात्र कधीच बदलली नाही, ती त्यांची पांढऱ्या कपड्यांची ओळख. स्वित्झर्लंडमधील दावोस ((Switzerland, Davos) परिषदेत गेल्यानंतर मात्र त्यांनी कात टाकली. एरव्ही सदासर्वकाळ पांढऱ्या कपड्यात दिसणारे एकनाथ शिंदे दावोसमध्ये चक्क सुटाबुटात दिसले. काळ्या रंगाचा ओव्हरकोट, काळी पँट, व्हाईट शर्ट आणि स्वित्झर्लंडच्या गुलाबी थंडीपासून बचाव करण्यासाठी थर्मल वेअर.
दावोस परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं, तेव्हा ते बदले बदले से नजर आ रहे थे. साहेबांच्या देशात ते साहेब बनले होते. उद्योगमंत्री उदय सामंतांनी शिंदे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. अर्थात शिंदेंच्या आवडीचा व्हाईट शर्ट त्यांनी घातला होताच. पण लक्ष वेधून घेत होता तो त्यांचा काळा ओव्हरकोटच.. दावोसमध्ये पांढराशुभ्र बर्फ पडला होता, पण दावोसपासून मुंबईपर्यंत चर्चा रंगली होती ती शिंदेंच्या ब्लॅक अँड व्हाईट लुकचीच. याच सुटाबुटात त्यांनी विविध परदेशी उद्योजक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी लाखो करोडो रुपयांचे सामंजस्य करार केले.
दावोस दौरा यशस्वी करून मुख्यमंत्री शिंदेंचं विमान मुंबईत लँड झालं, तेव्हाही ते थ्री पीस सूटमध्येच दिसले... मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. मात्र शिंदेंच्या या साहेबी लुकनं त्यांना देखील आश्चर्याचा धक्का नक्कीच बसलाच असेल.
हे ही वाचा : राज्यातील 1 लाखाहून अधिक तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये कोट्यवधींचे सामंजस्य करार
महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक
स्वित्झर्लंडमधल्या (Switzerland) दावोस (Davos) इथं गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी 1 लाख 37 हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार (Memorandum of Understanding) झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. दावोस इथं पहिल्यांदाच महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसतं, असं सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात (Magnetic Maharashtra) गुंतवणूक करण्याची संधी असून दावोसमध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.