लोअर परळ स्थानकावरील पूल पाडण्यासाठी ११ तासांचा 'मेजर मेगा ब्लॉक'

'या' मार्गाने 'बेस्ट' ठरणार प्रवाशांची तारणहार 

Updated: Feb 2, 2019, 11:58 AM IST
लोअर परळ स्थानकावरील पूल पाडण्यासाठी ११ तासांचा 'मेजर मेगा ब्लॉक' title=

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर असणाऱ्या लोअर परळ स्थानकावरील डिलाईल रोडवरचा पूल तोडण्यासाठी आज, शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत तब्बल ११ तासांचा 'मेजर मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सर्व जलद मार्गाच्या उपनगरीय गाड्या दादर आणि विरार/डहाणू रोड स्थानकादरम्यान चालतील आणि सर्व धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या वांद्रे-बोरिवली/भाईंदर/विरार दरम्यान चालणार आहेत. 

पूल तोडण्याच्या कामामुळे असणाऱ्या या ब्लॉकमध्ये लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकच्या कारणास्तव शनिवारी रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी शेवटची लोकल सुटेल. तर, अप दिशेवरून लोकल ही साडेआठ वाजता विरार येथून सुटेल. अप दिशेच्या सर्व धीम्या लोकल या वांद्र्यापर्यंत धावतील. तर, जलद लोकलच्या फेऱ्या या दादरपर्यंत राहणार असून, त्या फलाट क्रमांक चार आणि पाचवर थांबणार आहेत. 

'बेस्ट' ठरणार तारणहार 

पश्चिम रेल्वे मार्गावर असणाऱ्या या ब्लॉकमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट बस प्रवाशांसाठी तारणहार ठरणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृतातनुसार बेस्टचे प्रवक्ते बी.ए. झोडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या ब्लॉकदरम्यान, एकूण सहा जादा बस सोडण्यात येणार आहेत. ज्यापैकी तीन बस या बॅकबे आणि तीन वरळी बस आगारातून सोडण्यात येतील, असं ते म्हणाले. 

चर्चगेट ते दादर या मार्गावर या बस फेऱ्या धावणार असून, त्या मार्गात येणाऱ्या मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ आणि प्रभादेवी या स्थानकांवरुन ही बस जाईल. 

शनिवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून या बस फेऱ्या सुरु होणार असून, त्या मध्यरात्री १ वाजून २५ मिनिटांपर्यंत सुरु राहतील. तर, रविवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून बस फेऱ्या सुरू होणार असून, त्या सकाळी १२ वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असतील, ही अत्यंत महत्त्वाची माहितीही झोडगे यांनी दिली.