देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय? फडणवीसांची विनंती मान्य होणार?

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. फडणवीसांनी हे वक्तव्य का केलं, त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 5, 2024, 08:55 PM IST
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय? फडणवीसांची विनंती मान्य होणार? title=

Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारूण पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्वीकारली. उपमुख्यमंत्रीपदाचा (DCM) राजीनामा देण्याचे संकेतही त्यांनी दिले. विधानसभेच्या तयारीसाठी सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती त्यांनी भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वाला केलीय. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) एकच खळबळ उडालीय. फडणवीसांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? त्यांनी नेमका कुणाला इशारा दिलाय? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालीय. फडणवीसांचं हे वक्तव्य म्हणजे भाजप नेतृत्वावर व्यक्त केलेली नाराजी आहे, असा अर्थ काढला जातोय.

फडणवीसांचा बॉम्ब... नेमका अर्थ काय?
2019 मध्ये फडणवीस एकहाती निर्णय घेत होते. मात्र आता त्यांना महाराष्ट्रात निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य पक्ष नेतृत्वानं दिलेलं नाही. याउलट महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या नेत्यांना झुकतं माप दिलं जातंय. राज्यसभा उमेदवार ठरवताना फडणवीसांना विश्वासात घेण्यात आलं नाही. पक्ष सोडून गेलेल्यांसाठी पुन्हा लाल गालिचे अंथरण्यात आले. फडणवीसांना उपमुख्यमंत्री केल्यानं चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला

एवढं होऊनही लोकसभा निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. भाजप उमेदवारांसाठी सर्वाधिक जाहीर सभा घेतल्या. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर वाराणसीतही पंतप्रधान मोदींसाठी फडणवीसांनी प्रचार केला. आता विधानसभा निवडणुकीसाठीही सर्व शक्तीनिशी उतरणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय..

अवघ्या पाच-सहा महिन्यांवर विधानसभा निवडणुका लागणार आहेत. भाजपला महाराष्ट्रात पुन्हा एकदा नंबर वन पक्ष बनवायचं फडणवीसांचं ध्येय आहे. त्यामुळंच सरकारमधून मोकळं करण्याची त्यांची विनंती भाजपचं केंद्रीय नेतृत्व मान्य करणार का, याकडं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचं लक्ष असणाराय.

भाजपचा वाद चव्हाट्यावर
फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी केल्यानंतर भाजपमधला वादही चव्हाट्यावर आलाय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी महाराष्ट्र तसंच मुंबईतल्या भाजप नेत्यांवर निशाणा साधलाय. एका माणसाची लाईन छोटी करण्याच्या नादात सगळ्या पक्षाचं नुकसान झालं आहे. आता याची जबाबदारी कोण घेणार? महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी ही जबाबदारी घ्यायला हवी, अशी पोस्ट मोहित कंबोज यांनी केलीय. तर फडणवीसांचं हे विधान म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा देण्यासाठी असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय.

आता फडणवीसांचा राजीनामा केंद्रीय नेतृत्त्व मान्य करणार का... की भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर फडणवीस आपला निर्णय बदलणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.