Loksabha 2024 : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून आताची मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपाबाबत (Seat Sharing) गेले अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. अखेर मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास शिवसेना ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा लढणार आहे. भिवंडी, सांगली, दक्षिण मध्य आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्नगी सुटलाय. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, जालन्याची जागा काँग्रेस, सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजू शेट्टी महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या उमेदवारीवरून मविआत गोंधळ उडालाय...राजू शेट्टींनी मविआसोबत यावं अशी इच्छा होती...मात्र, शेट्टींनी पाठिंबा न घेतल्यास आम्हाला उमेदवार द्यावा लागेल असं विधान जयंत पाटलांनी केलंय...तर दुसरीकडे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी राजू शेट्टींशी संवाद उद्धव ठाकरे साधत असल्याचं म्हटलंय...यामुळे दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या विधानानं मविआत गोंधळ उडाल्याचं दिसतंय.
वंचितचा निर्वाणीचा इशारा
दरम्यान, वंचितच्या अल्टिमेटमची दखल न घेतल्याने प्रकाश आंबेडकरांनी (Prakah Ambedkar) मविआला निर्वाणीचा इशारा दिलाय. लाचारी आम्ही कधीही मान्य करणार नाही. माझ्या आजोबांची म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी लाचारीविरोधात चळवळ चालवली होती. मात्र, जिथे चळवळीलाच लाचार केल्या जातात, याला आम्ही कधीही मान्य करणार नाही असा असा इशारा आंबेडकरांनी दिलाय.
वचितसमोर 5 जागांचा प्रस्ताव
प्रकाश आंबेडकरांनी मविआला अल्टिमेटम दिल्यानंतर मविआत धावाधाव सुरू झालीय. आता मविआनं प्रकाश आंबेडकरांसमोर चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव ठेवलाय. वंचितला मविआकडून आणखी एक अधिकची जागा देण्यात आलीय. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय असेल, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. वंचित बहुजनच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाची यादी जाहीर होणारंय. त्यामुळे वंचितबाबत मविआनं अजूनही वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं दिसतंय.
काँग्रेसला मोठा धक्का
गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. उसेंडी हे गडचिरोली-चिमूल लोकसभेसाठी इच्छूक होते. मात्र गटातटाच्या राजकारणामुळे तिकीट कापल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी डॉ. उसेंडींची भेट घेतली असून दोघांमध्ये बंद दाराआड चर्चाही झालीये. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशोक नेतेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गडचिरोलीत येणार आहेत. याच काळात उसेंडी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.