Loksabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha 2024) तारखांची घोषणा होऊ शकते. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadhi) जागावाटपावरुन अद्याप तू-तू मै-मै सुरु आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (UBT) मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास सुरवात केलीय. नुसतं उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तबच नाही तर त्यांना थेट प्रचाराला लागण्याचे आदेशच देण्यात आलेत.
चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात?
महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तीढा सूटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत केलंय. मातोश्रीवर सांगली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तर याच मतदारसंघातून माजी हिंद केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांचे नाव चर्चेत आलंय.
चंद्रहार पाटील बुधवारी ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता. पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला आहे
सांगली जागेवरुन राडा
दरम्यान, उबाठा गट सांगली लोकसभा मतदारसंघ मिळाला पाहिजे असा दावा करत असतानाच काँग्रेस कोअर कमिटीने सांगली लोकसभाचा आढावा घेत उबाठा गटाला थेट इशारा दिला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीने कायम काँग्रेस लढवत आली आहे. दरम्यान, रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ वरूनही महाविकास आघाडीमध्ये चुरस आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तिन्ही पक्ष ठाम आहेत तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट जागा लढवण्यावर आग्रही आहेत.
चंद्रहार पाटील निवडणुकीच्या तयारीला
चंद्रहार पाटील गेल्या चार महिन्यांपासूनची लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. रक्तदान चळवळीच्या माध्यमातून त्याने जिल्ह्यातील गावागावात संपर्क सुरु केला आहे. सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेचंही आयोजन करण्यात आलंहोतं. याशिवाय देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.