Loksabha 2024 : उत्तर पश्चिम मुंबईमधून उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) अमोल किर्तीकरांना (Amol Kirtikar) उमेदवारी जाहीर झाली आणि दुसरीकडे ईडी (Enforcement Directorate) किर्तीकरांच्या दारी दाखल झाली. कोविड काळातल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडी अमोल किर्तीकरांची चौकशी करणार आहे. त्यासाठी ईडीने किर्तीकरांना समन्सही बजावलंय. अमोल किर्तीकरांना ईडीचं समन्स आल्यावर ठाकरे गटातही वेगवान घडामोडी घडल्या. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक पार पडली. स्वत:ला अमोल किर्तीकर समजून कामाला लागा असे आदेशच उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत..
कोण आहेत अमोल कीर्तिकर ?
अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव आहेत. गजानन किर्तीकर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तर अमोल किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवत ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरेंनीही उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली..
मात्र उमेदवारी जाहीर होताच किर्तीकरांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम अमोल किर्तीकरांच्या उमेदवारीवरुन नाराज झालेयत. अमोल किर्तीकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने सहकार्य न करण्याची घोषणा निरुपमांनी केलीय आणि खिचडीचोर म्हणत अमोल किर्तीकरांना डिवचलंसुद्धा..
मुंबई महापालिकेत कथित खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना याप्रकरणी ईडीने अटक केलीय. आता याच प्रकरणी अमोल किर्तीकरांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारावरही अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरु आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांची यादी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 17 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. खासदार संजय राऊतांनी ट्विट करत यादी जाहीर केली. त्यात काही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर काही नव्या चेह-यांनाही संधी मिळालीय. मुंबईतल्या 4 जागा ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आल्यात. काँग्रेस आग्रही असलेल्या सांगलीत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर संभाजीनगरमध्ये दानवे इच्छुक असताना पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना संधी मिळालीय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईतून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीये...याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कडाडून विरोध केलाय...मुंबईमध्ये राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांची बैठक सुरू असताना, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली...ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षालाच उमेदवारी हवी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे...