दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. या अधिवेशनात तीन महत्वाचे ठराव आणले जाण्याची शक्यता आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध, मराठा-ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा आणि ओबीसींचा इंपेरिकल डेटा केंद्रानं द्यावा असे हे ठराव येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ठराव आणून महाविकास आघाडी भक्कम आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.
स्वप्निल लोणकर या 24 वर्षांच्या तरुणाच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. स्वप्निल लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावरून आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार असल्याची माहिती आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद यावेळी मात्र झाली नाही. मार्च महिन्यात कोरोना असतानाही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली होती. पण यावेळी मुख्यमंत्र्यांकडून या परंपरेला छेद देण्यात आला. मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता होती. पण पत्रकार परिषद होणार की नाही, याची कोणतीच अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली नाही.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची तब्बल 3 तास बैठक चालली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला मात्र यावेळी बगल देण्यात आली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार तोफ डागलीये.