मुंबई : INS विक्रांत बचाव (Save INS Vikrant) मोहिमेत भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 58 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
न्यायालयाने हा 58 कोटींचा आकडा आला कुठून अशी विचारणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रवक्ता 58 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करतात, लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल होतो. पण गेल्या दहा दिवसांपासून एकही कागद ते देऊ शकलेले नाहीत. 58 कोटी कुठून आणले याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या तीन महिन्यात दहा नौटंकीचे प्रकार केले. जेव्हा जेव्हा ठाकरे सरकारमधील कोणत्या नेत्याची संपत्ती जप्त झाली, तेव्हा तेव्हा किरीट सोमय्यांवर आरोप केला जातो. पंतप्रधानांनी पत्र लिहिलं गेलं. किरीट सोमय्यांनी घोटाळा केला म्हणून. उद्धव ठाकरेंनी एसआयटी बसवली, पण आज दोन महिने झाले काहीही निष्पन्न झालं नाही.
किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या वसईतल्या कंपनीत 426 कोटी वाधवानने गुंतवले, पालघरच्या कंपनीत 260 करोड टाकले, राकेश वाधवान पार्टनर आहे, जुहूचा 100 कोटींचा जमीन घोटाळा, पवईचा एसआरए घोटाळा, असे अनेक आरोप उद्धव ठाकरे यांनी केले पण काहीही निष्पन्न झालं नाही असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
गेले दोन दिवस मी काही लोकांसाठी नॉटरिचेबल असेन, पण मी व्यवस्थित काम करत होतो, आणि उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.