"राजेश नार्वेकर विकले गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी करुन दाखवावा"; किरीट सोमय्यांचे आव्हान

Kirit Somaiya : राजेश नार्वेकर हे संजय राऊत यांच्या मुलीचे सासरे आहेत. त्यांनीच आम्हाला क्लिनचिट दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे

Updated: Dec 18, 2022, 12:21 PM IST
"राजेश नार्वेकर विकले गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी करुन दाखवावा"; किरीट सोमय्यांचे आव्हान title=

Maharashtra Politics : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला होता. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन शौचालय निर्माण केले असाही आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.

संजय राऊत यांचे व्याही आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर हे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत. राजेश नार्वेकर यांनीच शौचालय घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट दिल्याचा दावा किरीट सोमय्या केला आहे. पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी हा दावा केलाय. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे दाखवत हा दावा केला आहे.

राजेश नार्वेकर संजय राऊतांचे व्याही

"संजय राऊत यांच्या मुलीच्या सासरे आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आम्हाला, युवक प्रतिष्ठानला नोटीस दिली. निर्दोष असल्याचे सगळी कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला क्लिन चीट दिली. संजय राऊत तुमच्या व्याहींनी आम्हाला क्लिनचीट दिली आहे. 100 कोटींच्या घोटाळ्यात युवक प्रतिष्ठानची चूक नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजेश नार्वेकर यांच्यावर आरोप करावेत. राजेश नार्वेकर विकले गेल्याचा आरोप त्यांनी करुन दाखवावा," असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

प्रकल्प मिळून 15 कोटींचाही नव्हता - किरीट सोमय्या

"उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सांगावे की मातोश्रीमध्ये ते बैठका घेत होते की नाही. तुमच्यात हिंमत असेल तर राजेश नार्वेकर यांनी विश्वासघात केल्याचे सांगावे. मनिषा म्हैसरकर यांनीही क्लिनचिट दिली आहे. हा प्रकल्प 2007-08 मध्ये पूर्ण झाला. हा प्रकल्प मिळून 15 कोटींचाही नव्हता, असे अहवालात म्हटले आहे. आता त्यांनी सांगावे की हा अहवाल खोटा आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले.