दुर्दैवी : मित्राचे भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी हा तरुण गेला होता मात्र त्यालाच जीव गमवावा लागला

Updated: Aug 9, 2022, 11:02 PM IST
दुर्दैवी : मित्राचे भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : भांडण सोडताना तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये (Virar) समोर आला आहे. मित्राचे भांडण सोडवण्यासाठी हा तरुण गेला होता. मात्र दुर्दैवाना त्यालाच या भांडणात जीव गमवावा लागला आहे.

विरारमध्ये दोन तरुणांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोपचर पाडा परिसरात घडली. 5 ऑगस्टच्या रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी दानिश शेख या आरोपीला अटक केली आहे.

चंदनसार रोडवरील साईदत्त झोपडपट्टीत राहणारा सद्दाम मन्सूरी हा त्याचा मित्र मुमताज आणि अनवरूल यांसोबत गप्पागोष्टी करत गोपचर पाडा येथील जगदंबा मेडिकलच्या बाहेर उभा होता. त्याच वेळी अनवरूल याचे एका अनोळखी व्यक्ती सोबत भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी सद्दाम गेला असताना आरोपीने सद्दामच्या पोटात व पाठीत चाकूने वार करून जखमी केले.

त्यानंतर जखमी सद्दामला  कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी मयत सद्दामचा भाऊ हैदरअली याने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 
त्यानंतर पोलिसांनी आरोपी दानिश शेख याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करत त्याला मुंबईच्या कुर्ला परिसरातून अटक केली आहे.