ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यासंदर्भातच्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील वादानंतरही लोया प्रकरणात अरूण मिश्रा हेच न्यायमूर्ती असणार आहोत. यापूर्वी ठराविक न्यायमूर्तीकडे प्रकरण हस्तांतर केले जात असल्याचा आरोप चार न्यायमूर्तींनी केला होता. त्यामुळे चार न्यायमूर्तींच्या आक्षेपानंतरही सर्वोच्च न्यायालयात सर्व काही ठिक आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. जस्टिस लोयांच्या मृत्यूवरुन गेले काही दिवस पुन्हा वादळ उठलंय. यासंदर्भातल्या याचिकेवर लवकरच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काय आहे हे लोयांचं संशयास्पद मृत्यू प्रकरण पाहुया....
जस्टिस ब्रिजगोपाल लोया हे गुजरातमधल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात CBI कोर्टाचे न्यायाधीश होते. याच खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही आरोप असल्यानं हा खटला राजकीयदृष्ट्याही संवेदनशील झाला होता. नागपूरमध्ये एका लग्नसोहळ्याला गेलेले असताना लोया यांचा 1 डिसेंबर 2014 मध्ये संशयास्पद मृत्यू झाला. जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असं सांगण्यात येतं. लोया यांच्या मृत्यूनंतर सोहराबुद्दीन एन्काऊन्टर खटल्यातून अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हृदयविकाराच्या झटक्यानं लोहियांचा मृत्यू झाला, एवढ्या चार शब्दांत संपलेलं हे प्रकरण नव्हतं. लोयांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आक्षेप खुद्द त्यांच्या वडिलांनी आणि बहिणीनं घेतला होता. त्याचवेळी सोहराबुद्दीन खटल्यासंदर्भात लोयांवर दबाव असल्याचंही त्यांच्या नातेवाईकांनी म्हंटलं होतं. लोयांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा झाल्यावर पुन्हा त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानंच झाला, असंही माध्यमांनी सांगितलं. पण लोयांचा पोस्टमार्टम रिपोर्ट, त्यांच्या मृत्यूची नेमकी वेळ, मृत्यूनंतर त्यांचे कपडे, त्यांच्या शरीरावरच्या खुणा, हे काही संशयाचे मुद्दे होते. यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय.
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधात नुकत्याच केलेल्या बंडावेळीही जस्टिस लोया यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर जस्टिस लोया यांच्या मृत्यूप्रकरणी कुठलाही संशय नाही, असं त्यांच्या मुलानंच स्पष्ट केलं.
आता खुद्द मुलानंच जस्टिस लोया यांच्या मृत्यूवर संशय नाही, म्हंटल्यावर कदाचित या मुद्द्यावरचं राजकारण शमेलही. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामध्ये या सगळ्या खटल्याला काय वळण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.