मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. ठाण्यातल्या एका व्यक्तीने जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकाने आव्हाडांच्या घरी नेऊन आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ही घटना गंभीर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बडतर्फ करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. @CMOMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2020
सामान्य माणसांवर अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही.
न घाबरता प्रत्येकाला आपले मत मांडता आले पाहिजे.
सोशल मीडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे.
पण शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 7, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे आणि मेणबत्ती लावण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. यानंतर पीडित तरुणाने आव्हाडांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केला होता.
मारहाणीचा आरोप झालेल्या तरुणाने ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. '५ एप्रिलला रात्री साध्या वेशात आलेले २ पोलीस मला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नेत असल्याचं कारण त्यांनी सांगितलं. पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीतून ते मला आव्हाड यांच्या विवियाना मॉल जवळ असलेल्या नाथ बंगल्यावर घेऊन गेले. बंगल्यावर १५ ते २० जणांनी मला बेदम मारहाण केली,' असे आरोप या तरुणाने केले आहेत.
'काठी तुटल्यानंतर वेताचे बांबू, लोखंडी पाईप आणि कंबर पट्ट्याने माझ्या हातावर, पाठीवर, कंबरेवर मारहाण करण्यात आली. घराच्या प्रवेशद्वाराजवळ जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. आव्हाडांनी मला फेसबूक पोस्ट का टाकली? अशी विचारणा केली. ही पोस्ट मी भावनेच्या भरात आणि अतिउत्साहाने लिहीली असं सांगून मी त्यांची माफी मागितली आणि पोस्ट डिलट करतो असं सांगितलं. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याने माझ्या घरी फोन केला आणि फेसबूकवरची ती पोस्ट डीलिट करायला सांगितलं. तिथल्या व्यक्तीने माझा माफी मागण्याचा व्हिडिओ बनवायचा आहे, असं सांगून पुन्हा मला मारहाणीला सुरुवात केली,' असं पीडित व्यक्तीने तक्रारीमध्ये म्हणलं आहे.
कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाडांपासून वाचवा!
कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण.मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ही `मोगलाई' का `शिवशाही'@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @OfficeofUT @PMOIndia @News18lokmat pic.twitter.com/WCCbg2Kus6— Niranjan Davkhare (@niranjandtweets) April 7, 2020
भाजपचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी पीडित तरुणाला मारहाण झाल्याचा फोटो आणि पोलिसात तक्रार केलेली कॉपी ट्विटरवर शेयर केली आहे. कोरोना राहू द्या, आधी आव्हाडांपासून वाचवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही मोगलाई आहे का शिवशाही? असा सवाल निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. अशा विकृतांना पाठिंबा देऊ नका. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाविरुद्ध कुणी असं केलं तर तुम्ही हे सहन कराल का? बेकायदेशीर गोष्टींचं मी समर्थन करत नाही, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.