मुंबई / नवी दिल्ली : डबघाईला आलेल्या जेट कंपनीच्या कर्मचाऱ्याची नालासोपाऱ्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दरम्यान, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दिल्लीत जंतरमंतरवर कर्मचाऱ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला.
जेटच्या मुंबईतील कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली. शैलेशकुमार सिंह असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नालासोपाऱ्यात राहत होते. गेल्या वीस वर्षांपासून ते जेट एअरवेजमध्ये कामाला होते. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरच्या उपचारासाठी सुट्टीवर होते. त्यांचा मुलगाही जेटचाच कर्मचारी आहे. आर्थिक संकटात जेट सापडल्याने त्यांच्या मुलाचा पगार झाला नव्हता. त्यामुळे तणावात असलेल्या शैलेशकुमार यांनी इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
Delhi: #JetAirways employees and their families hold candle light protest at Jantar Mantar. pic.twitter.com/T9DZ2hqyle
— ANI (@ANI) April 27, 2019
आर्थिक डबघाईला आलेल्या जेटच्या कर्मचाऱ्यांनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर मेणबत्ती मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या संख्येने जेट कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. जेट एअरवेज कंपनी बंद पडली आहे. यामुळे जेटमधल्या हजारो कर्मचाऱ्यांचे कित्येक महिन्यांचे पगार थकले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आपल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.