मुंबई: शासकीय अधिकारी सुशील गर्जे यांच्या वन्यजीव छायाचित्रांच प्रदर्शन

गेल्या 15 वर्षांपासून सुशील गर्जे यांनी वन्यजीव छायाचित्रणाचा छंद जोपासला असून, वन्यजीवांची रोडावत चाललेली संख्या त्यांना चिंताजनक वाटते.

Updated: Jan 7, 2018, 04:02 PM IST
मुंबई: शासकीय अधिकारी सुशील गर्जे यांच्या वन्यजीव छायाचित्रांच प्रदर्शन title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शासकीय सेवेत अधिकारी असलेले सुशील गर्जे यांच्या वन्यजीव छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरू आहे. गेल्या 15 वर्षांपासून सुशील गर्जे यांनी वन्यजीव छायाचित्रणाचा छंद जोपासला असून, वन्यजीवांची रोडावत चाललेली संख्या त्यांना चिंताजनक वाटते. त्यामुळे फोटोग्राफीतून ते वन्यजीव वाचवण्याचा संदेश देतात.

पुरातत्व विभागात अधिकारी असलेले सुशील गर्जे यांनी टिपलेली ही वन्यजीव छायाचित्रं पाहणारा, नकळत वेगळ्याच दुनियेत हरवून जातो. प्रत्यक्ष जंगलातलं वातावरण आणि थरार ही छायाचित्रं आपल्या डोळ्यांसमोर उभी करतात. जहांगिर कलादालनात ‘एन्डेन्जर्ड’ अर्थात लुप्त पावणारे या शिर्षकाखाली भरवलेल्या या प्रदर्शनात, लुप्त पावत चाललेल्या काही प्राण्यांची छायाचित्रंही गर्जे यांनी मांडली आहेत. मूलतः प्राण्यांना वाचवा हा संदेश देणं हाच या प्रदर्शनामागचा मुख्य उद्देश आहे.

वाघ हा अन्नसाखळीतला मुख्य घटक आहे. वाघ संपला तर निसर्गाचा संपूर्ण समतोलच बिघडणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे सुशील गर्जे यांच्या या प्रदर्शनाच्या केंद्रस्थानीही वाघच आहे. जंगलात एकटा वावरणारा वाघ, शिकार करणार वाघ, कुटुंबवत्सल वाघ अशी वाघाची वेगवेगळी रुपं आपल्याला इथं पहायला मिळतात. या खेरीज या प्रदर्शनात वन्यजीव प्राण्यांबरोबरच निसर्गाच्या विविध रंगछटाही आपल्याला पहायला मिळतात. भारतातील ताडोबा, बांधवगड, जिम कार्बोट नॅशनल पार्क, रणथंबोर यासह, परदेशातल्या केनियासह इतरही देशांतल्या अभयारण्यात फिरून सुशील गर्जे यांनी ही छायाचित्रं टिपली आहेत. शासकीय सेवेत राहूनही वन्यजीवांवरच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या रक्षणासाठी गर्जे यांनी जोपासलेला हा छंद, आपल्यालाही वन्यजीवांच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही.