नुकसान होतंय हे खरंय पण.. तसा कोणताही निर्णय नाही; महामंडळाची स्पष्टोक्ती

कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून नुकसान वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही.   

Updated: Feb 22, 2022, 03:27 PM IST
नुकसान होतंय हे खरंय पण.. तसा कोणताही निर्णय नाही; महामंडळाची स्पष्टोक्ती title=

मुंबई : एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत आहे. मात्र, हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले. 

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ हा संप सुरु आहे. या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे ही वस्तूस्थिती असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.

महामंडळाचे होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून हे नुकसान वसूल करण्याचा कोणताही प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन नाही. त्यामुळे निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अशा तथ्यहिन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही चन्ने यांनी केलंय. 

संपामुळे सर्वसामान्य प्रवासी, ज्येष्ठ नागरीकांचे, शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असं आवाहन त्यांनी केलंय.