राष्ट्रवादीला आणखी एक धक्का? भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या भेटीला

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 25, 2019, 08:24 PM IST
राष्ट्रवादीला आणखी एक धक्का? भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या भेटीला title=

मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव हे येत्या २-३ दिवसात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली, असंही बोललं जात आहे.

एकीकडे भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु असतानाच छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतही संभ्रम आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहेत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं असलं, तरी उद्धव ठाकरेंनी मात्र या प्रश्नाला ठाम नकारही दिला नाही.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही भाजप गाठली. दुसरीकडे साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

दरम्यान बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलास तरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. विलास तरे हे सलग दोन वेळा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी या पक्षातून बोईसर मतदारसंघातून निवडून आले. भविष्यात कोण शिवसेनेत येईल, हे लवकरच कळेल, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.